
‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी आता मोठय़ा पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’ चित्रपटाची घोषणा झाली आणि तेव्हापासून ‘पांडू’ नेमपं कोण साकारणार, या चर्चांना वेग आला. नुकताच चित्रपटाचा टीझर लाँच झाला असून भाऊ कदम ‘पांडू’च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्राला विनोदाची मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो की चित्रपट, मराठी नाटक असो की लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचं स्थान कायम अढळ राहिलेलं आहे. या विनोदी परंपरेला मोठं करण्याचं काम केलंय इथल्या अनेक विनोदवीरांनी. काळू-बाळूपासून ते अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोडय़ांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचे नाव डोळ्यापुढे येते. ‘पांडू’मधील भूमिकेबद्दल भाऊ म्हणाला, ‘सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांंच्या मनावरचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे.’ झी स्टुडिओज निर्मित आणि विजू माने दिग्दर्शित ‘पांडू’ येत्या 3 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.





























































