मजूर बनला ग्लॅमरस मॉडेल, फोटोग्राफरने केली किमया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या जगात कुणाचे नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. असंच काहीसं एका रोजंदारीवर काम करणाऱया मजुराचे झाले आहे. लुंगी-शर्टमध्ये असणारा 60 वर्षीय मजूर चक्क टाय-सूटवाला मॉडेल बनला आहे. ही किमया केली आहे, एका फोटोग्राफरने. आता या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मम्मिक्का असे या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचे नाव आहे. त्याने सूट घालून आयपॅडसह पोझ देत प्रमोशनल फोटोशूट केले. या रोजंदारी कामगारामध्ये मॉडेलिंगची प्रतिभा शोधून काढणारा फोटोग्राफरचे नाव आहे शारिक वायलील. शारिकने याआधी त्याच्या सोशल मीडिया पेजवर मम्मिक्काचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर जेव्हा फोटोग्राफरकडे काम आलं तेव्हा तो मम्मिक्काशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नव्हता.

मम्मिक्काचे आता एक इन्स्टाग्राम पेज आहे, जिथे तो त्याचे नेहमीच्या कपडय़ांमधील तसेच मेकओव्हरचे फोटो पोस्ट करतो. मम्मिक्का या यशाने खूश आहे. नियमित नोकरीसह ऑफर मिळाल्यास तो मॉडेलिंग सुरू ठेवणार आहे. सोशल मीडियावरही त्याची दिवसेंदिवस फॅन फॉलोईंग वाढत आहे.