
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दीड हजाराचे गाजर दाखवत महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतून आता बहिणींना एक-एक धक्के दिले जात आहेत. लातूरमध्ये अर्जांची छाननी केल्यानंतर तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
गेले सात महिने दरमहा दीड हजार रुपये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यात जमा होत होते. मात्र, आता अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीत अनियमितता, कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचे तर काही अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तताच न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे 25 हजार 136 अर्ज बाद केल्याचे जिल्हा परिषद विभागाने दाखवले.
लातूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 92 हजार अर्ज प्राप्त झाले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी ठरवण्यात आलेल्या निकषानुसार त्रुटी आढळलेले अर्ज बाद करण्यात येत आहे. त्यामुळे योजनेचा आठवा हफ्ता येणार की नाही? याबाबत बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.































































