लॅगट, अलेमुने जिंकली मुंबई मॅरेथॉन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आशिया खंडातील सर्वात मानाची शर्यत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये या वर्षी वेग व प्रेरणा याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ‘इन्स्पायर टू बी बेटर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या शर्यतीला पहाटे 5.30 वाजता गुलाबी थंडीत सुरुवात झाली. यावेळी हिंदुस्थानसह जगभरातील तब्बल 47 हजार धावपटू धाव धाव धावले. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुषांची तर इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने महिलांची फुल मॅरेथॉन जिंकली. हिंदुस्थानच्या सुधा सिंग हिने महिला गटातून तर नितेंद्रसिंग रावत याने पुरुष गटातून फुल मॅरेथॉन जिंकतानाच दोहा येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचे तिकीटही बुक केले.

महिला गटात वॉर्कनेश अलेमू हिने 2.25.45 अशी वेळ देत शर्यत जिंकण्याची करामत करून दाखवली. या गटात इथियोपियाच्याच ऍथलीटस्चा दबदबा दिसून आला. पहिल्या दहापैकी आठ खेळाडू याच देशाचे होते हे विशेष. पहिल्या सात स्थानावर इथियोपियाच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले.

‘बेटी बचाओ’चा नारा
चाईल्ड हेल्प फाऊंडेशनने मुंबई मॅरेथानचे औचित्य साधत ‘बेटी बचाओ’ हा संदेश जनमानसापर्यंत पोहचवला.

सोशल मीडियाचा अतिरेक करू नका
सध्याच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. मात्र ‘सोशल मीडियाचा अतिरेक करू नका. त्यामुळे नैराश्य येते’ असा संदेश यावेळी युवकांनी दिला.

धावपटूंसाठी कूल शॉवर्स
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंसाठी पहिल्यांदाच ‘कूल शॉवर्स’ची खास व्यवस्था ठेवण्यात आली होती.

जिद्दीला सलाम
मुंबई मॅरेथॉनमध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच हिरिरीने सहभाग घेतला. व्हीलचेअरवरील व्यक्तींनी भल्यापहाटे या शर्यतीला उपस्थित राहून धावण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्या या जिद्दीला सलाम.