भूमिकांनी खूप  काही शिकवले – ललित प्रभाकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जशी आयुष्याच्या प्रवासात आपल्याला भेटणारी माणसे काही ना काही शिकवण देत असतात. तशीच किंबहुना, त्याहीपेक्षा किंचित आगळीवेगळी शिकवण कलाकारांनी साकारलेल्या भूमिका त्यांना देत असतात. ती भूमिका साकारताना ही गोष्ट त्यांच्या लक्षातही येते, पण भूमिका साकारून झाल्यानंतर कित्येक दिवस, महिने आणि वर्षे उलटून गेली तरीही त्या व्यक्तिरेखेकडून मिळालेली पॉझिटिव्ह विचारांची ऊर्जा जाणवत राहते, आणि हेच त्या भूमिकेचे आणि कलाकाराचे यश असल्याचे अभिनेता ललित प्रभाकर याने सांगितले.

मला सांगायला अभिमान वाटतो की, माझ्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांनी मला नाव, ओळख, प्रसिद्धीचे वलय, जिवापाड प्रेम करणारा चाहतावर्ग असे बरेच काही दिले, पण त्याहीपलीकडे जाऊन एक माणूस म्हणून दुसऱया माणसाकडे, संपूर्ण जगाकडे पाहण्याची एक नवी नजर दिली.

अगदी सुरुवातीच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’मधला आदित्य अगदी आयडियल मुलगा, नवरा, भाऊ होता. ‘चि. व चि.सौ.कां.’मधले कॅरेक्टरसुद्धा धमाल होते. ‘हम्पी’मधला कबीर  स्वतःत रमणारा, सोलो ट्रव्हलिंग करणारा असा होता. मलाही एकटय़ाला भटकंती करायला खूप आवडते. त्यानंतर कित्येकांनी मला भेटून सांगितले की, कबीरकडून प्रेरित होऊन ते स्वतः एकटे ट्रव्हलिंग करायला लागले. आयुष्य एका वेगळय़ा अर्थाने जगायला लागले.

‘आनंदी गोपाळ’मधील गोपाळराव स्वतःच्या विचारांशी ठाम असणारे, स्वतः स्वतःशी कन्व्हेन्स झाल्यानंतर संपूर्ण जग जरी विरोधात उभे राहिले अगदी रक्ताच्या माणसांसकट तरीही स्वतःच्या पत्नीला शिक्षणासाठी, तिचे नव अवकाश शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आणि थेट देशाबाहेर पाठवून तिला सुशिक्षित करून आणणारे गोपाळराव हे कॅरेक्टरही बरेच काही शिकवून जाणारे होते. स्वतःच्या जोडीदाराला ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरित करणार असे व्यक्तिमत्त्व!

‘मीडिअम स्पाइसी’ या चित्रपटासाठी शेफची भूमिका आणि त्यातील तीस दिवसांचे ट्रेनिंग मला विद्यापीठातही न मिळालेले ज्ञान देऊन गेले. अन्न बनवणाऱयाची मेहनत आणि अन्नाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला देऊन गेला. प्राइस आणि व्हॅल्यू काय असते अन्नाची हे नेमके शिकवून गेला. एखादा पदार्थ रांधताना त्यात किती जिवापाड मेहनत लागते. बनवणाऱयाचे अपार कष्ट असतात आणि खाणाऱयांनीसुद्धा त्याची जाण ठेवून ते ‘अन्न परब्रम्ह आहे’ हे समजून उमजून खाल्ले गेले पाहिजे ही शिकवण मिळाली.

‘पेट पुराण’मध्ये मुलं नाही तर प्राणी दत्तक घेऊन पेट प्यारेंटिंग हा धमाल विषय शिकवला. मुक्या प्राण्यांकडून निर्व्याज्य, निर्विकार प्रेम कसे करावे हे खरेच शिकून घेण्यासारखे आहे. लळा लावणे म्हणजे काय हेही नेमके समजून जाते आणि आता येऊ घातलेल्या टर्रीमध्ये नगरची ग्रामीण पार्श्वभूमी तिथली बोली, तो बाज, लहेजा आणि त्यातले संग्राम हे अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्व! काळे पांढरे असे काहीच नसलेला सरळ साधे जीवन जगणारा. जे काही करेल आयुष्यात ते फार मनापासून करणारा आणि म्हणूनच सर्वांच्या मनापर्यंत पोहोचणारा असा संग्राम. एकदा शब्द दिला समोरच्याला की जीव गेला तरी बेहत्तर, पण तो शब्द पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही ही संग्रामची शिकवण. नाते मग ते रक्ताचे असो किंवा बिनरक्ताचे, मानलेले असो किंवा सख्खे… ते सच्चा दिलानेच निभवायला पाहिजे हा संदेश देणारा संग्राम. खरंच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही तरी शिकवण दिलीय आणि मला खात्री आहे की, भविष्यातसुद्धा अशा विविध अंगी भूमिका मला मिळतील आणि ललितला दरवेळी एक नवा ललित मिळत जाईल.