पाबळमध्ये शेकापला खिंडार, शिवसेनेच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड

536

पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत ही शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. परंतु या वेळी कुरनाड येथील शिवसेनेच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याने हा शिवसेना-भाजप युतीसाठी शुभशकुनच असल्याचं पाबळ विभाग प्रमुख नरेश शिंदे यांनी म्हटलं आहे.

पाबळ ग्रृप ग्रामपंचायतीची निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होऊ घातली आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड व पाबळ विभाग प्रमुख नरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येत असून प्रभाग क्रमांक 2 कुरनाडमधून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या निधीतून या विभागात अंतर्गत रस्ते, मोरी, नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत अनेक विकासकामे प्रस्तावित केले आहेत. युती शासनाच्या माध्यमातून पाबळ खोर्‍याचा विकास होत असल्याने खोट्या भूलथापा देणाऱ्या शेकापला ग्रामस्थ हद्दपार करतील व पाबळ ग्रृप ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकेल असा विश्वास उपजिल्हा प्रमुख व पंचायत समिती सदस्य नरेश गावंड यांनी व्यक्त केला. बिनविरोध निवडून आलेल्या ललिता दामोदर पाटील यांचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी पुष्पहार घालून व पेढे वाटून अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या