
सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्याच्या सिंहगड घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रविवार व पावसाचे औचित्य साधून सिहंगडावर जाणाऱ्या हजारो पर्यटकांच्या पदरी निराशा आली आहे. दरड हटवण्याचे काम चालू असून पावसामुळे कामात अडथळा येत आहे.
पुण्यात शनिवारी रात्री व आज पहाटेपासून पाऊस पडतोय. या पावसामुळे सिंहगड घाटातील रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे हवेली पोलीस आणि वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे अनेक पर्यटकांना अर्ध्या वाटेतूनच माघारी जावे लागले. दरड हटवण्याचे काम सध्या चालु असुन यासाठी किती कालावधी लागणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण, रविवारी दिवसभर हा रस्ता बंद राहण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
गेल्या वर्षी ३०जुलै रोजी संध्याकाळी अशाच प्रकारे दरड कोसळली होती. ज्यामुळे असंख्य पर्यटक घाटात अडकले होते. त्यावेळी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा काढण्यात यश आले होते. नंतर एकेरी वाहतुक सुरु करुन पर्यटकांची सुटका करण्यात आली. यंदा सुदैवाने पहाटे हा प्रकार घडल्याने गडावर पर्यटक नव्हते.


























































