
जमीन मोजणीची कामे करण्यासाठी नगर जिल्ह्यात तीन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात जूनअखेर सर्व मोजण्या पूर्ण होऊन नकाशे देण्यात येणार आहेत. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास तो राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. दरम्यान, घरपोच वाळूवितरण सुरू झाले असून, वाळू उपशासाठी लागणारा खर्च राज्य शासन करणार असल्याचेही ते म्हणाले. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री विखे म्हणाले, ‘मोजणीची प्रक्रिया भूसंपादन विभागामार्फत केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी मोजण्या होत नाहीत, नकाशे मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन नगर जिह्यातील साडेतीन हजार प्रकरणांपैकी 768 प्रकरणांमध्ये मोजणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी एका महिन्यात 254 मोजण्या करून दिल्या आहेत. जिह्यातील सर्व मोजण्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मोजणी झाल्यानंतर 15 दिवसांत नकाशा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
अवैध वाळूउपसा होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपयांत वाळू देण्यात येणार आहे. वाळूउपशापासून डेपोपर्यंत वाहतुकीचा खर्च राज्य शासन करणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसणार नाही. नागरिकांनी संबंधित डेपोमधून वाळू घेऊन जावी. त्याला ती सहाशे रुपयांमध्ये मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला ऑनलाइन पद्धत अवलंबलेली आहे. गरज पडल्यास ऑफलाइन पद्धतही सुरू करण्यात येईल. मात्र, तशी पद्धत लगेच सुरू होणार नाही. उद्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये साठा झाल्यानंतर लगेचच वाळूची विक्री सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवकाळीची नुकसानभरपाई मिळणे बाकी
अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अजूनही काहीजणांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. एकूण 850 कोटी रुपये येणे बाकी आहेत. लवकरात लवकर हे पैसे शेतकऱयांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अनेक प्रकरणे प्रलंबित होती. त्याचे पैसे देणेसुद्धा बाकी होते. आता प्रलंबित प्रकरणांसाठी लागणारे अनुदान त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
वाडिया पार्कसाठी नवीन समिती
नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी माहिती घेतली जात असून, यासाठी एक नवीन समिती नियुक्त करण्यात येणार आहे. दुसरीकडे एका आर्किटेक्टची नियुक्ती करून काय काय करणे अपेक्षित आहे, याचा आढावा घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा अहवाल तयार करणार असल्याचेही मंत्री विखे-पाटील म्हणाले.

























































