
सामना प्रतिनिधी । कर्जत
सोमवारी दुपारी पुन्हा बोरघाटात दरड कोसळल्याने पुणे कडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणेकडे जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस यांना त्यामुळे काही काळ कर्जत, भिवपुरी स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते. खंडाळा घाटात होणाऱ्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरातील ही पाचवी घटना आहे.
सोमवारी दुपारी 4.35 मिनिटांनी बोरघाटातील पलसदरी आणि जामरुख यांच्यामध्ये 106 किलोमीटर वर एक मोठा दगड पुणे कडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर पडल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती. पुणे कडे जाणारी चेन्नई एक्सप्रेस कर्जत येथे, सिंहगड एक्सप्रेस भिवपुरी येथे तर नागरकोईल एक्सप्रेस पलसदरी येथे थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान ही दरड काढण्यासाठी कर्जत येथून रेल्वे कर्मचारी तत्काळ रवाना झाले असून दरड काढण्याचे काम लगेच चालू करण्यात आले आहे. थांबवून ठेवण्यात आलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना मिडल ट्रॅक वरून काढून पुणे कडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.





























































