गेली 15 वर्षे ती सायकलवरून विकते भाजीपाला आणि हाकते संसाराचा गाडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगांव

स्वकर्तृत्वावर व दिवसरात्र काबाडकष्ट करुन कोपरगांवच्या शारदा नगर भागातील शारदा ज्ञानेश्‍वर पवार या महिलेने सातत्याने 15 वर्षापासून सायकलवर भाजीपाल्याची विक्री करुन संसाराचा गाडा आदर्श पद्धतीने हाकला आहे. भाजीवाल्या पवार बाई म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे.

शारदा पवार यांच्या पतीचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना पाच मुली एक मुलगा आहे. अनिता, सुनिता, मनिषा, सोनाली, विजया या पाचही मुलींचे त्यांनी लग्न करुन दिले. त्यांना एक निखिल नांवाचा मुलगा असून तो सध्या दहावीत शिकतो. पतीच्या निधनानंतर पवार यांच्यावर कुटूंबाची मोठी जबाबदारी पडली. त्यात त्या खचून न जाता हिंमतीवर त्यांनी जिद्दीने कष्टाची तयारी ठेवत भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला. कोपरगांवच्या भाजी मार्केट मधुन त्या सकाळी सकाळी खरेदी करतात व सायकलवर फिरुन त्याची विक्री करतात. त्या विक्रीतून त्यांना दिवसाकाठी 200, 250 रु रोज मिळतो त्यावरच त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना टाकळीफाट्यानजिक दोन एकर शेती आहे परंतु ती कोरडवाहू असल्याने व करण्यासाठी कोणी नसल्याने त्यांना शेतीचे कुठलेही उत्पन्न फारसे मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी जीवनाचा गाडा आजही सक्षमपणे पेलवला आहे. शासनाने आमच्या सारख्यागोरगरिबांचे पाठीराखे होवून आम्हाला त्यांनी आधार द्यायला हवा व मदतीचा हात दिला तर जीवन जगण्यासाठी मोठी उर्जा त्यामुळे मिळू शकेल, असे त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलतांना केले.