मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय :वाढदिवसाची सुंदर भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची निर्मिती होणार आहे. ही वाढदिवसाची सुंदर भेट असल्याचे सांगत लता मंगेशकर यांनी आज राज्य सरकारचे आभार मानले.

सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना लता मंगेशकर यांनी लिहिलंय, माझ्या मनात फार काळापासून एक इच्छा होती की, महाराष्ट्रात एक जागतिक दर्जाचे संगीत विद्यालय असावे; जिथे देशातील सर्व तसेच पाश्चात्य देशांतील अनेक गायन, नृत्य, वादन प्रकारांचा आपल्या तसेच जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा. ही इच्छा मी आदित्य ठाकरे याला एकदा सांगितली आणि आदित्यने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यावर निर्णय घेतला. आणि महाराष्ट्र सरकारने काल माझ्या जन्मदिनानिमित्त मला सुंदर भेट देत, माझ्या वडिलांच्या नावाने जागतिक दर्जाचे ’मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ निर्माण करण्याची घोषणा केली. मला मनापासून याचा आनंद होत आहे. मी या सर्वांचे आणि सरकारचे या सुरेल निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार मानते.