ही मदत की कुचेष्टा! ‘त्या’ शेतकऱ्याची खताचे पोते,10 किलो पावडर व तुरीचे बियाणे देऊन कृषी विभागाकडून बोळवण

‘राजा उदार झाला हाती कथलाचा वाळा दिला’ याचा प्रत्यय अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी दांम्पत्य पवार कुटुंब घेत आहे. शासनाच्या कृषी विभागाने पवार दाम्पत्याला एक खताचे पोते आणि 10 किलो पावडरचे बकेट देऊन बोळवण केली आहे. लोकप्रतिनिधींनी तर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

अहमदपुर तालुक्यातील हडोळती पंचाहतरी ओलाडलेल्या बैल बारदाना नसल्यामुळे येथील शेतकरी अंबादास पवार यांनी शेतीचा मशागतीसाठी स्वःत औताला जुंपूंन घेतले. ते स्वत: पत्नी मुक्ताबाईसह शेती मशागत करत आहेत. याची दखल सर्व प्रथम दै. सामनाने घेतली. त्यांचा शेतात मशागत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व सर्वचजण हेलावून गेले. विधानसभेत देखील अंबादास पवार यांची दखल घेतली गेली.

त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अंबादास पवार यांची भेट घेतली व त्यांना डी.ए.पी खताचे एक पोते, कापसासाठी बायो पावर हेमीक ऑसिडचे 1 बकेट (10 किलो), बियाण्यांची एक बॅग देऊन जणू काही शेतकऱ्याची थट्टाच केली. या बाबत कृषी अधिकाऱ्याशी व तलाठी यांच्याशी आधिक माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही . कृषी विभागाने खताचे पोते देऊन शेतकऱ्याची थट्टाच मांडली, महसुल प्रशासन तर आले सुद्धा नाही. शेतकरी अंबादास पवार यांना अद्याप कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही सरकार काहीच करू शकत नाही ‘ फक्त मन की बात करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जगाच्या पोशिंद्यावर ही ओढावलेली परिस्थिती शासनाला दिसत नाही का अशी चर्चा सोशल मीडियावर दिसत आहे.

पिकाला कवडीमोल भाव आहे, खत बियाणेचे वाढलेले भाव यामुळे शेती परवडनाशी झाली आहे. दोन एकर शेतीवर लेकरा बाळाचे शिक्षण, डोक्यावर सहकारी बॅंकेचे कर्ज , कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ नाही, घर प्रपंच कसा भागणार. माझी व्यथा सांगून कांही उपयोग नाही, सरकार कांहीच करू शकत नाही असे अंबादास पवार यांनी दै. सामनाशी बोलताना सांगितले.