
लातूर शहरातील युवकाने दुचाकींची चोरी करून त्या सोलापुर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथे विकण्याचा प्रयत्न करत असताना लातूर पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.
पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीमधील अॅक्टिवा गाडी विकण्यासाठी एक इसम कुर्डूवाडी जि.सोलापूर येथील एका विश्रामगृह परिसरात येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ कुर्डूवाडी येथील विश्रामगृह परिसरात पोचून तेथे सापळा लावला. एकजण काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा गाडीवरून येत असताना दिसला. पथकातील पोलिसांनी त्या अॅक्टिवा गाडीच्या चालकास थांबून त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रोहित सुभाष अलगुडे (वय 26 वर्ष, रा.वडारवस्ती खाडगाव रोड लातूर सध्या रा. भैय्याचे रान, भीम नगर, कुर्डूवाडी जि.सोलापूर) असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या अॅक्टिवा गाडी संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले की, सदरची अॅक्टिव्हा गाडी काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगून सदरच्या चोरी केलेल्या मोटारसायकली तो सध्या राहत असलेल्या कुर्डूवाडी येथील घराच्या समोरील मोकळ्या जागेत ठेवलेल्या असल्याचे सांगितले. त्यावरुन सदर पथकाने त्याठिकाणी जाऊन त्या मोटारसायकली ताब्यात घेऊन त्याचे चेसिस व इंजिन नंबर वरून पडताळणी केली असता सदरच्या मोटारसायकली या लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
तसेच इतर दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 6 मोटारसायकली असे मिळून एकूण 11 मोटारसायकल (किंमत 3 लाख 48 हजार रुपये) असा मुद्देमाल सदर इसमांकडून हस्तगत करण्यात आला आहे. रोहित अलगुडे याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

























































