
सामना प्रतिनिधी। लातूर
मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट आहे, लवकरच केंद्राची दुष्काळ पाहणी समिती बोलावण्यात येईल. राज्य शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचप्रमाणे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल तीन टप्यात ही रक्कम देण्यात येईल. तसेच एक महिन्याच्या आत शासकीय रुग्णायाच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
लातूर येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उदद्याटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री महाजन, महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनिल गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशात आजारी व्यक्ती उपचाराविना मरणार नाही याचा निर्धार शासनाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना आयुष्यमान भारत सुरु केली आहे. आरोग्य सेवेचे मोठे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
लातूर येथील शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्यात जागा उपलब्ध करुन देणार, शासकीय वैद्यकीय महावि़द्यालयातील विविध सोयी सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. अर्थसंकल्पापूर्वीच ३० कोटी रुपये दिले जातील, अर्थसंकल्पात ३० कोटी देऊ आणि त्यानंतर ३० कोटी दिले जातील. घाबरू नका पुढील मुख्यमंत्रीपण मीच राहणार आहे असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. निसर्गच कोपलेला आहे, परंतु शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहील. मागील वर्षी ८० टक्के पाऊस झाला यावर्षी राज्यात ७७ टक्के पाऊस झाला तर मराठवाड्यात ७० टक्केपर्यंत पाऊस झाला आहे. ३१ डिसेंबर पर्यंत टंचाईचा आढावा घेतला जाईल. केंद्राची दुष्काळ पाहण्याची समिती बोलावून पाहणी करण्यास सांगू, शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील शासनाने १५ वर्षात शेतकऱ्यांसाठी ७ हजार कोटी दिलेले होते. या सरकारने केवळ साडेतीन वर्षात २२ हजार कोटी रुपये दिलेले आहेत. मागील सरकारने ४ कोटी रुपयांची कर्जमाफी दिलेली होती. विद्यमान शासनाने २२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. १५ वर्षात ४५० कोटी रुपयांची खरेदी शासनाने केली विद्यमान शासनाने ८५०० कोटी रुपयांच्या धान्याची खरेदी केलेली आहे असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले. प्रधानमंत्री आवास योजनेतून १० लाख बेघरांना २०१९ पर्यंत घरे देणार. देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य ही योजना राबवणारे ठरेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगीतले की, मराठवाड्यात पाण्याची कमतरता आहे, हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळावे. लातूरला उजनीचे पाणी मिळावे अशी मागणीही त्यांनी केली.































































