Latur news – राँग साईडने आलेल्या बसने दुचाकीला उडवलं; 11 वर्षीय चिमुकली जागीच ठार, वडील गंभीर जखमी

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) मोडजवळ लांबोटा-तोगरी हायवेवर बुधवारी बस आणि दुचाकीचा भाषण अपघात झाला. या अपघातात ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. लिजा चांद मुजावर (वय – ११) असे मुलीचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तिच्या वडिलांना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाने रॉंग साईडने येऊन दिली धडक

निलंगा ते उदगीर जाणाऱ्या बस चालकाने अंबुलगा मोडलगत लांबोटा-तोगरी हायवेवर रॉंग साईडने येऊन मोटारसायकलला धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात झालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर उपस्थित असलेल्या काही तरुणांनी दुचाकीने पाठलाग करत बस थांबवली आणि संबंधित बस चालकास निलंगा पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील बस चालकावर निलंगा पोलीस ठाण्यात बेजोदारपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक हनुमंत बांगर हे करत आहेत.

संतप्त जमावाचा रास्ता रोको

​अपघातानंतर संतप्त झालेले नातेवाईक आणि गावकऱ्यांनी बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत काही काळ रस्ता अडवून धरला. यामुळे हायवेवर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर तणाव वाढल्याचे पाहून निलंगा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी पोलीस गाडी पाठवली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला आणि रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला. बस चालकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.