
लातूर पोलिसांनी जप्त केलेल्या 40 लाखांच्या गुटख्यावर डल्ला मारणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2021 रोजी 84 लाखांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकार्याचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे कलम 272, 273 ,328, 34 भादवि गुन्हाही दाखल करण्यात आला होता. जप्त मुद्देमाल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे सदरचा मुद्देमाल गोडाऊनला सीलबंद करून ठेवण्यात आला होता.
जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गोडाऊनमधील माल कमी असल्याचे दिसले. एकूण 40 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल गोडाऊनमध्ये प्रवेश करून चोरून नेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे कलम 454, 457, 380, 34, 328 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे करीत आहेत.



























































