डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या विकासकामासाठी बौद्ध बांधवांचे आमरण उपोषण

129

सामना प्रतिनिधी । लातूर 

निलंगा तालुक्याती मौजे हलगरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण, सिमेंट रस्ता पेव्हर ब्लॉक हे काम  गेल्या एक ते दीड वर्षापासून होत नसल्याबाबत येथील बौद्ध बांधव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

मौजे हलगरा येथील बौद्ध वस्तीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रस्ता व पेव्हर ब्लॉकचे काम नोव्हेंबर २०१७ मध्ये 2 लाख 95 हजाराचा निधी व दि 28 मार्च 2018 रोजी 2 लाख 95 हजाराचा निधी असा एकूण 5 लाख 90 हजाराचा निधी शासन स्तरावर मान्यता मिळून देखील अद्याप हे काम झाले नाही. याबाबत ग्रामपंचायत कार्यालय स्थरावरुन सरपंच व ग्रामसेवक यांनी कसल्याच प्रकारची तसदी घेतली नाही.

सदर कामाबाबत येथील बौद्ध बांधवानी गावचे सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी पं. स.निलंगा, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषेद लातूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. सदर काम करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे बौद्ध बांधवांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

सदरील हलगरा गाव हे लातूर जिल्हा परिषेदेचे विद्यमान समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांच्या जि.प गटामध्ये येत असून याकडे त्यांनीही याकडे दुर्लक्षच केल्याचे सिद्ध होते.  त्याच प्रमाणे हलगरा गावच्या सरपंच मंगलबाई व्यंकटराव पाटिल यांचा मुलगा दत्ता पाटिल हा अमेरिकेत बसून ग्रामपंचायतिचा कारभार व विकास कामाबाबतचे निर्णय घेत असतो अशी चर्चा गावातील ग्रामस्थांमध्ये होत आहे.

महिला आरक्षणाचे सरपंच पद असतांना हाती रिमोट कंट्रोल घेऊन सरपंच पुत्र अमेरिकेत बसून जर कारभार पाहत असेल तर हे खरे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्नाने दिलेल्या महिला आरक्षणाचा हा अपमान नाही काय ? आमच्या प्रतिनिधिनी उपोषणस्थळी भेट देऊन चौकशी केली असता जोपर्यंत हे काम चालू होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या उपोषणास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास गायकवाड़ यांच्या नेतृत्वाखाली होत असून या उपोषणास गोविंद सूर्यवंशी, वैजिनाथ जाधव, लहू गवळे, दत्तू टोंपे यांच्यासहअनेक ग्रामस्थ उपोषण करीत आहेत.

या उपोषणास भारिप बहुजन महासंघाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप बनसोडे, नंदाताई गाड़े महिला तालुकाअध्यक्ष निलंगा, प्रदीप सोनकांबळे, मारोती माधव बंडगर पंचायत समिती सदस्य , समयोदिन देशमुख, लक्ष्मण शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या