कट प्रॅक्टीसविरुद्ध लवकरच कायदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्यात रुग्णसेवा स्वस्त होण्याऐवजी डॉक्टरांच्या कट प्रॅक्टीसमुळे दिवसेंदिवस महागडी होत आहे. डॉक्टरांच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी लवकरच ‘कट प्रॅक्टीसविरोधी’ कठोर कायदा करण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज ही घोषणा केली.

शहरातील बीड बायपास परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या अल्पाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी पाटील डोणगावकर, आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे, डॉ. किरोडीलाल मीना, उद्योजक ईश्वरीलाल जैन, सरला मठाचे अधिपती रामगिरी महाराज, अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडकर, माजी महसूल आयुक्त भास्कर मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाजन म्हणाले, राज्यात सध्या मोठ्या हॉस्पिटल्सपासून ते छोट्या रुग्णालयापर्यंत डॉक्टरांनी कट प्रॅक्टीस सुरू केली आहे. त्यामुळे रुग्णांचा प्रचंड पैसा खर्च होत आहे. ही कट प्रॅक्टिसची पद्धत पॅथॉलॉजी लॅबपासून सुरू होते आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशेंट शिफ्ट होईपर्यंत रुग्णांकडून पैसा उकळला जातो. हा प्रकार बंद व्हावा यासाठी लवकरच कायदा करू व रुग्णांचा होणारा छळ थांबविण्याचा प्रयत्न करू, असेही महाजन म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मराठवाडा, विदर्भात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने मराठवाड्यासाठी संभाजीनगर व विदर्भात नागपूर येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णानां तसेच नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंगेश राजपूत व डॉ. शैलेश जायदे यांनी केले.