
जालना जिल्ह्यातील जाफराबादच्या ऍड. किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील संशयित विकास गणेश म्हस्के याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साताऱयात पकडले. पत्नीनेच दोघांच्या मदतीने वकील पतीचा खून केल्याचे समोर आले असून, पकडलेला संशयित साताऱयात लपून वास्तव्य करत होता.
मनीषा लोखंडे हिचा विवाह ऍड. किरण लोखंडे यांच्यासोबत मे 2022 मध्ये झाला होता. अवघ्या चार महिन्यांतच या दोघांमधील भांडणे विकोपाला गेली होती. यातूनच मनीषाने गणेश आगलावे व विकास म्हस्के (रा. वाल्हा, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्या मदतीने पतीचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री संशयितांनी ऍड. किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच, नाक व तोंड दाबून ठार मारले. खुनानंतर मृतदेह घरातच ठेवून घराला कुलूप लावून संशयित निघून गेले.
खुनाच्या दुसऱया दिवशी 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी संशयितांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी संशयितांनी घरातील सिलिंडरचा पाईप काढून रेग्युलेटर चालू करून ठेवले आणि काडी लावली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात वकिलाचा मृत्यू झाला, असा भासवण्याचा संशयितांचा प्रयत्न होता. मात्र, पंचनामा झाल्यानंतर त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले. या स्फोटात मृतदेह पूर्ण जळाला नाही व शवविच्छेदनात अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांकडे विचारपूस केली असता कोडे उलगडत गेले. पत्नी मनीषा लोखंडे आणि तिचा साथीदार गणेश आगलावे यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर संशयितांची धरपकड पोलिसांनी केले. यातील एक संशयित विकास म्हस्के पसार झाल्यानंतर तो ठिकठिकाणी राहिला. संशयित हा साताऱयात आल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कारवाई करून त्याला पकडले व जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष तासगावकर, फौजदार अमित पाटील, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, मोहन पवार, गणेश कापरे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.


























































