
गोरेगाव चित्रनगरीतील आपल्या उपहारगृहासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करणारे साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आपले उपोषण मागे घेतले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर गायकवाड यांच्या उपहारगृहाची वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
शासनाने 1995 पासून लक्ष्मण गायकवाड यांना उदरनिर्वाहासाठी चित्रनगरीत जागा दिली होती. तिथे ते उपहारगृह चालवत होते. या जागेचे भाडे 25 हजार रुपये होते. आता फूटासाठी 200 रुपये भाडे लावून 2 लाख 36 हजार रुपये दाखवण्यात आले आहे. भाडे न भरल्याने वीज आणि पाणी तोडले गेले होते. 2017 च्या करारानुसार आपण भाडे देण्यास तयार असून सध्या आपण दीड लाख रुपये भाडे देत होतो. उपहारगृह बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे उपहारगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली होती.
मुख्यमंत्री उद्धक ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून गायकवाड यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात विधान भवन येथे झालेल्या बैठकीत दिले तसेच गायकवाड यांच्या उपहारगृहाची कीज, पाणी पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले.
























































