
सामना प्रतिनिधी । पुणे
भाजपची विचारधारा देशाला घातक आहे म्हणून त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. त्या त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकाऱ्यांसाठी आज हडपसर निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. पवार म्हणाले, देशात आघाडीशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या राज्यात त्या पक्षाला महत्त्व द्या, असा नवीन प्रस्ताव केंद्रातील आघाडीसमोर ठेवला आहे आणि त्याला पाठिंबादेखील मिळतो आहे.
वास्तव सांगण्याचे धाडस मोदींमध्ये नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पवार यांनी पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली का, असा सवाल केला. राफेल प्रकरणात खूप आरोप झाले; परंतु पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्री त्यावर शब्ददेखील बोलत नाहीत. एवढे आरोप झाले असताना वास्तव सांगण्याचे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नाही, असे सांगितले.





























































