
आयटी क्षेत्रातील नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण असतो. महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार बॅंकेच्या खात्यात जमा होत असला तरी स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आणि कुटुंबियांसाठी फारसा वेळ मात्र त्यांच्याकडे नसतो. ऑफीसच्या रोजच्या रुटीनला कंटाळलेल्या अमरावतीच्या बकुळ खेतकडे या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने मनःशांतीसाठी यू-टय़ूबवरील व्हिडिओ पाहून ऑनलाईन मंडला आर्टचे धडे गिरवायला सुरुवात केली. हळूहळू कलेत पारंगत झाल्यावर तिने आयटी क्षेत्रातील नोकरीला रामराम ठोपून ऑनलाईन पेंटिंग विक्रीचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तिच्या पेंटिंगला देश-विदेशातून मागणी मिळत असून महिन्याकाठी ती बक्कळ कमाई करतेय.
बकुळ हिने 2011 साली काॅम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुणे आणि मंगळुरू येथे तिने मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी केली. सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून कलेच्या क्षेत्राकडे कशी वळलीस याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना बकुळ म्हणाली, ‘‘आयटी क्षेत्रात नोकरी करताना कामाच्या रोजच्या हेक्टिक शेडय़ूलचा मला फार कंटाळा आला होता. स्वत:च्या आवडीनिवडी जपायला किंवा घरातल्यांसोबत फोनवर बोलण्यासाठीदेखील वेळ नसायचा. या सगळ्यातून कधी एकदाची सुटका होतेय असे वाटायचे. मनःशांतीसाठी योगा आणि प्राणायम याव्यतिरिक्त आणखी काय करता येईल याच्या मी शोधात होते. त्या वेळी यू-टय़ूबवर मला मंडला आर्ट दिसले.’’ पुढे ती म्हणाली, ‘‘ मंडला आर्ट शिकण्यासाठी बिझी शेडय़ूलमधून मी आवर्जून वेळ काढू लागले. पेंटिंगमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवरील विविध पेज फॉलो केले. प्रॅक्टीस करून बऱयापैकी पेंटिंग जमू लागल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. पुढे वडिलांच्या निधनानंतर मी अमरावतीत परतले. त्यानंतर गेल्यावर्षीपासून पूर्णवेळ कलेच्या क्षेत्रात काम करत आहे.’’
सोशल मीडियामुळे कला देश-विदेशात पोहोचली
बकुळने यू-टय़ूबवरील ऑनलाईन व्हिडिओ पाहून मंडला, वारली, मधुबनी, फ्लोरल आर्ट, लाईन आर्ट, अॅव्रेलिक पेंटिंगचे धडे गिरवले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ती पेंटिंग तयार करते. पेंटिंगचा आकार आणि त्यात किती डिटेल्स आहेत त्यानुसार वेळेचं आणि किमतीचं गणित ठरतं, असे ती सांगते. सुरुवातीला आपल्या काही पेंटिग्स तिने फेसबुक, इन्स्टाग्रामवरील विविध पेजवर ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या. त्याला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी सिडनी आणि यूएसएमधूनदेखील तिला ऑर्डर मिळाल्या. सध्या महिन्याकाठी तिला 25 ते 30 पेंटिंगची ऑर्डर मिळत आहे.
कोरोनाच्या या संकटात अनेकांनी नोकऱया गमावल्या आहेत. दुसरीकडे काही जण कामाच्या तणावामुळे इतर जॉबच्या शोधात आहेत. नोकरी करा पण त्यासोबत आपला आवडता छंद आवर्जून जोपासा. प्रत्येकाने आयुष्यात प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. कदाचित तुमचा आवडता छंदच तुम्हाला करियरचा दुसरा पर्याय उपलब्ध करून देईल. – बकुळ खेतकडे, चित्रकार
























































