
डिस्को किंग, गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱया बप्पी लहरी यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला असला तरी संगीतक्षेत्रात त्यांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली होती. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलीवूडमध्ये रॉक आणि पॉप गाण्यांचा ट्रेंड रुजवण्याचे श्रेय त्यांना जाते. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या गाण्यांची जादू आजही कायम आहे.
घरातूनच मिळाला संगीताचा वारसा
बप्पीदा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे वडील अपरेश लहरी बंगाली गायक होते तर त्यांची आई बन्सुरी लहरी गायिका आणि संगीतकार होत्या. वयाच्या तिसऱया वर्षी बप्पीदांची तबल्यावर पहिली थाप पडली. दादू (1972) या बंगाली चित्रपटातून वयाच्या 19 व्या वर्षी बप्पीदा यांनी संगीतकार म्हणून कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. ‘नन्हा शिकारी’ हा त्यांचा पहिला बॉलीवूडपट. ताहीर हुसेन यांच्या जखमी या चित्रपटाने गायक -संगीतकार म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली.
‘डिस्को किंग’ म्हणून ओळख
ऐंशी-नव्वदच्या दशकात बॉलीवूडचे ‘डिस्को किंग’ म्हणून ते नावारूपाला आले. ‘डिस्को डान्सर’नंतर सगळीकडे त्यांचीच गाणी ऐकू येऊ लागली. मिथुन चक्रवर्ती आणि जितेंद्र यांच्या चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली. ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘डान्स डान्स’, ‘कमांडो’, ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीताचा साज चढवला. ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’, ‘उह ला ला’, ‘दे दे प्यार दे ’, ‘पग घुंगरू बांध’, ‘तम्मा तम्मा’, ‘ताकी ओ ताकी’, ‘यार बिना चैन कहाँ’ अशी त्यांनी शेकडो हिट गाणी दिली.
पाच दशके, पाच हजार गाणी
आपल्या 48 वर्षांच्या कारकीर्दीत बप्पीदांनी सुमारे विविध भाषांमधील पाचशेहून अधिक चित्रपटांत तब्बल पाच हजार गाणी संगीतबद्ध केली. त्यांच्या पॉप, डिस्को गाण्यांनी त्या काळात तरुणाईला वेड लावले. 1990 साली आलेल्या ‘डोक्याला ताप नाही’ या मराठी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते. 1986 साली त्यांनी 33 चित्रपटांतील 180 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची गिनीज बुकात नोंद आहे. बप्पी लहरी हे अमेरिकन रॉकस्टार एल्किस प्रेस्ली यांचे चाहते होते. त्यांच्यापासून प्रभाकित होऊनच त्यांनी सोन्याचे दागिने घालायला केली.
जेव्हा ‘मातोश्री’वर बप्पीदा अन् मायकल जॅक्सन भेटतात!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आमंत्रणावरून ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. त्यावेळी मायकलने ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. बप्पीदादेखील तिथे उपस्थित होते. ‘हे बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी आहेत,’ असे शिवसेनाप्रमुखांनी मायकलला सांगितले. त्यावर ‘मी यांना ओळखतो, त्यांची बरीच गाणी ऐकली आहेत’ असे मायकलने सांगितले. मायकलने बप्पीदा यांच्या गळय़ातील सोन्याची चेन बघितली आणि ती खूपच सुंदर असल्याची प्रतिक्रिया दिली. ही चेन मायकलला भेट द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला, परंतु या चेनमध्ये गणपतीचे लॉकेट होते. बप्पीदा यांची बाप्पावर खूप श्रद्धा असल्याने त्यांनी ती चेन मायकलला गिफ्ट केली नाही.
आपल्या देशाने आज खरा रॉकस्टार गमावला आहे. माझ्या कारकीर्दीत तुमचे आशीर्वाद लाभले, अनेकदा तुमच्यासोबत गाण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. बप्पीदा, तुम्ही खूप लवकरच निघून गेलात. तुमची खूप आठवण येईल.
– श्रेया घोषाल, पार्श्वगायिका1970 ते 1990 या काळात लक्ष्मीकांत-प्यारेलाल, पंचमदा, राजेश रोशन, नदीम-श्रवण यांच्यासारखे संगीतकार बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत होते. अशावेळेस बप्पी लहरी या जादुई संगीतकाराने स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. ज्याला आपण ‘देशी डिस्को’ असे म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी सर्व पिढय़ांसाठी संगीत तयार केले.
– सुभाष घई, निर्माते-दिग्दर्शक

























































