
राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये झालेला दारुण पराभव, पक्षातील विस्कळीत झालेली घडी, समन्वयाचा अभाव आणि पदाधिकाऱयांमधील नाराजीवर मंगलवारपासून भाजपच्या पदाधिकाऱयांचे दोन दिवस बौद्धिक घेण्यात येणार आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत संभाजीनगर, पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. नागपूरमध्ये तर भाजपच्या गडाला पार खिंडार पडले. हा पराभव भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. या निवडणुकांमुळे भाजपमधील नाराजी तर जाहीररीत्या पुढे आली आहे. पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. या पराभावचे विश्लेषण करण्याची जबाबदारी भाजपचे आमदार व नेते अॅड. आशीष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पुणे, नागपूर व संभाजीनगरचा दौरा करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर सोपवली आहे.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर 5 व 6 जानेवारी रोजी प्रदेश भाजपची संघटनात्मक बैठक होणार आहे. 5 तारखेला विविध संघटनात्मक बैठका होतील. पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा व इतर विभागांच्या अध्यक्षांची ऑनलाईन बैठक होईल. तर 6 जानेवारीला पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱयांची बैठक होईल. पक्षाचे केंद्रीय प्रभारी, सी. टी. रवी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील.
प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा
राज्यातील ग्रामपंचायत, महानगर पालिका व नगरपालिका निवडणुकांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची या निवडणुकीत पुनरावृत्ती झाल्यास पक्षाच्या केंद्रीय पातळीवर गंभीर दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सतत वादग्रस्त विधाने करणारे चंद्रकांत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन तरुण चेहरा देण्याची मागणीही भाजपमध्ये होऊ लागली आहे. या सर्वांचा लेखाजोखा या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.






























































