लेन्स आय – जादुई पोलर प्रदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋता कळमणकर

कला आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे फोटोग्राफी. छायाचित्रकाराचं मनोगत नेमकेपणाने दर्शवणारं बोलकं माध्यम. त्यात निसर्ग हा मुळातच भव्यदिव्य आणि सुंदर. त्यातील प्राणी निरागस, सुंदर आणि रोकठोक हिरव्यागार जंगलात टिपलेला वाघ असो किंवा निळसर बर्फावर चालणारा शुभ्र पोलर बेअर या वन्यजीवांची फोटोग्राफी म्हणजे दुधात साखर. स्वालबार्ड हे पोलर प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हटला जाणारा जादुई प्रदेश आणि येथे दिसणारे अनोखे प्राणी आणि पक्षी यांची फोटोग्राफी अतिशय आनंददायी होती.

स्वालबार्डच्या या जादुई पोलर प्रदेशात जहाजाच्या डेकवर उभं राहून आपण जेव्हा आजूबाजूचा परिसर न्याहाळतो तेव्हा सभोवती असणारी कडाक्याची थंडी, दूरदूरपर्यंत पसरलेला बर्फ या वातावरणात जीव कसे जगत असतील असा विचार करत असतानाच एखादा सील पोहताना, एखादा पक्षी मासा पकडताना दृष्टीस पडतो आणि लक्षात येतं की, पृथ्वीच्या या टोकावर पण अनोखे जीव नांदत आहेत.

अतिप्रचंड थंडीमुळे फोटोग्राफी तशी आव्हानात्मक आहे, परंतु बर्फावर पसरलेले महाकाय वॉलरस, फ्लिपरसारखे हातपाय असणारे विविध सील, रंगीत चोचीचा पफिन आणि पृथ्वी कवेत घेणारा प्रवासी पक्षी आर्क्टिक टर्न, गोठलेल्या बर्फाचे तयार झालेले विविध आकार हे कमी की काय म्हणून दूरवर चालत जाणारे शुभ्र पोलर बेअर, वर्षानुवर्षे बर्फ पडून त्याचे छोटे मोठे डोंगरासाखे साठे तयार होतात. वर्षानुवर्षे बर्फ साठून दबावामुळे त्यातील हवा निघून जाते व त्याचा रंग निळा होतो. हा निळा बर्फ त्यावर सूर्यकिरणे पडल्यावर खूप सुंदर दिसतो. या बर्फाचे विविध आकार मनाला सतत सुखावतात. त्यावर हमखास पक्षी बसलेले पाहायला मिळतात.

आर्क्टिकच्या संघर्षमय वातावरणात राहणारा आणि येथील अन्नसाखळीतील सर्वात वरच्या स्थानावर असणारा पोलर बेअर अर्थात ध्रुवीय अस्वल. पोलर बेअर नर हा 700 किलो वजनाचा, तर मादी 450 किलो वजनाची असू शकते. बर्फाच्या गुहेमध्ये पिलांना जन्म देणारा हा प्राणी अतिशय आाढमक व धोकादायक असतो. हा अतिशय तत्परतेने कुठल्याही वॉर्निंगशिवाय हल्ला करतो. भक्ष्याच्या शोधात तासन्तास न दमता बर्फाच्या पाण्यात पोहत राहतो. त्याला त्याच्या भक्ष्याचा वास फार लांबून, साधारण एक किलोमीटर अंतरावरूनही येतो. पांढरा रंग असून डोळे मात्र मोठमोठे बटन जडावल्याप्रमाणे सुंदर असतात. सील, छोटे वालरस, पक्ष्याची अंडी तसेच मोठे मासे हे याचे खाणे आहे. याची शुभ्र आणि सुंदर फर ही पोकळ आणि तेलकट असते. त्यामुळे पोहून झाल्यावर अंग झटकले की, हा कोरडा होतो. याच्या पांढऱया केसांमागची कातडी मात्र काळी असते. जी सूर्याची उष्णता शोषून घेण्यासाठी मदत करते. वैश्विक तापमानवाढ ही संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या मानवाच्या अमानवी भुकेमुळे निर्माण झाली आहे. आर्क्टिकच्या वातावरणात जो फरक पडतो तो जगभरच्या फरकापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे येथील अतिशय अनोखे आणि दुर्मिळ प्राणिजीवन धोक्यात आहे. आम्हाला जेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, तुम्ही पोलर बेअर आताच पाहिलात ते बरे झाले. कारण अजून 15 -20 वर्षांनंतर तो कदाचित दिसणार नाही.

पोलर प्रदेशातील दुसरा महाकाय प्राणी म्हणजे वॉलरस. हा महाबलाढय़ आाढमक असून नर साधारण 1300 ते 1500 किलो वजनाचा असतो. कातडी तपकिरी असून जाड, सुरकुतलेली असते. त्याचप्रमाणे सीलच्या जवळ जवळ सहा प्रजाती येथे आढळतात. सोबतच्या फोटोतील सील हा बेअरडेड सील असून चौकोनी आकाराचे शरीर असणारी ही सीलची आकाराने मोठी प्रजाती आहे. हा फोटो घेताना मी मुद्दामच आजूबाजूचा परिसर फोटोत समाविष्ट केला आहे. कारण यावरून आपल्याला त्याच्या जीवनसंघर्षाची कल्पना येते. स्वालबार्डमध्ये दिसणारा आर्क्टिक कोल्हा हा अतिशय फोटोजेनिक प्राणी. हिवाळ्यात पांढरी जाड फर असणाऱया या प्राण्याच्या फरवर उन्हाळ्यात तपकिरी करडा रंग आलेला दिसतो. पक्षी व त्यांची अंडी हे प्रामुख्याने याचे खाणे आहे.

पफिन या पक्ष्याला ध्रुव प्रदेशातील जोकर म्हणतात ते त्याच्या रंगीबेरंगी चोचीमुळे. अतिशय सुंदर असा हा पक्षी काही विशिष्ट भागातच पाहायला मिळतो. आम्ही जहाजातून उतरून छोटय़ा नावेत प्रवास करत असताना पाण्यामध्ये त्यांना पहिले. विविध गल, बदके, आर्क्टिक टर्न, स्कुवा असे कितीतरी विविध प्रकारचे पक्षी येथे दिसतात. आर्क्टिक टर्न हा फोटोतील पक्षी उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असा प्रवास करणारा जगातील एकमेव पक्षी आहे.
– [email protected]