
सामना प्रतिनिधी, नाशिक
पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणारा एक तरुण गुरुवारी सकाळी बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. वनविभागाने या परिसरात रेस्क्यू पथक तैनात केले आहे. मात्र, त्यांना बिबट्या आढळला नाही.
पांडवलेणीच्या मागील बाजूने डोंगरावर चार ते पाच ट्रेकर्स आज सकाळी चढत होते. अचानक एका बिबटय़ाने त्यांच्यावर झेप घेतली. यात सिडकोतील गणेश पानसरे (31) यांच्या पोटावर बिबटय़ाच्या पंजाचा ओरखडा उमटला. ट्रेकर्सनी केलेल्या आरडाओरडीमुळे बिबटय़ाने धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाला ही माहिती देण्यात आली. या राखीव वनाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण ढमाळे, नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र सोनार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुपारपर्यंत बिबटय़ाचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबटय़ा आढळला नाही.
पांडवलेणीजवळच महापालिकेचा कचरा डेपो आहे, तेथे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. सहज भक्ष्य उपलब्ध असल्याने बिबटे येत असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यापुढे ट्रेकर्सनी माहितगारांसमवेत, तसेच मोठय़ा समुहानेच या डोंगरावर चढाई करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून नाशिक व परिसरात बिबटय़ाचा संचार वाढला आहे. गेल्या काही दिवसात आडगाव परिसरातही बिबटय़ा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.




























































