
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटले वाडीत भरवस्तीत गोठ्यात शिरून बिबट्याने गाय मारली. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना असुन ग्रामस्थांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सध्या सह्याद्री पट्ट्यात विनापरवाना खैर तोडीच्या व लागवडीच्या नावाखाली राजरोसपणे जंगल तोड सुरू असल्याने रानातील जंगली प्राण्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. परिणामी, प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. भक्ष्याच्या शोधात असणाऱ्या बिबट्याने रात्री बाराच्या सुमारास भरवस्तीत कळंबस्ते साटले वाडीतील शकंर धोंडु वरेकर यांच्या गोठ्यात शिरून मोठ्या गाईवर हल्ला केला. गोठ्यातून गाईला सुमारे शंभर फुटापर्यंत ओढत नेऊन तेथे तिचा फडशा पाडला.
पंधरा दिवसांपूर्वी याच गावात रत्नाकर सनगरे व संतोष जुवळे यांच्या गोठ्यातील गाई बिबट्याने मारल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या बिबट्याचा वनखात्याने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.































































