दापोली – जालगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली शहरालगतच्या जालगाव ब्राम्हणवाडीतील मिसाळवाडीत एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले.

मिसाळवाडीत अमोल भिकाजी जाधव यांच्या घराजवळच्या एका विहिरीत बिबट्या पडला होता. ही माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यश आले.

विहिरीबाहेर काढण्यात आलेला बिबट्या नर जातीचा असून 4 वर्षाचा आहे. या बिबट्याचे वजन 70 ते 80 किलोग्रॅम असून तोंडापासून शेपटीच्या टोकापर्यंत 1.95 मीटर लांबी आणि 86 सेंटीमिटर उंची आहे. विहिरीबाहेर काढलेल्या बिबटयाच्या शरीरावर कुठेही लागलेले वा जखमा झालेल्या दिसत नव्हत्या. तरीही दापोली वनविभागाच्या आवारात पशूवैद्यकीय चिकित्सकांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात बिबट्याला सोडण्यात आले.