मासरुळ धरणात जेमतेम पाणीसाठा, दुष्काळातही थांबेना पाण्यावरील डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारध

यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पाणीप्रश्न गंभीर होणार आहे, मात्र विविध प्रकल्पांत असणाऱ्या जलसाठ्याचे संरक्षणही होताना दिसत नाही. परिसराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पद्मावती धरणातील पाण्यावर अनेकांकडून डल्ला मारणे सुरू आहे, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या सीमाभागातून बेसुमार पाणी उपसा सुरू आहे. याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

यंदाचा दुष्काळ पाहता पद्मावतीच्या मासरुळ धरणातील पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. यासाठी गेल्या आठवड्यात तालुका प्रशासन, वीज वितरण यांच्या संयुक्त पथकाने धरणाच्या परिसरातील भोकरदन तालुक्यातील वीजपुरवठा करणारे नऊ रोहित्र बंद करून पाण्याचा अवैध उपसा बंद करण्यात आला आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील सीमेवरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरूच आहे. त्यामुळे तेथून पाण्याचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच असल्यामुळे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.

याप्रकारामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. पद्मावती येथील मासरुळ धरणातून परिसरातील पन्नास गावांत पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाऊस पडला नसल्यामुळे धरणात जेमतेम पाणीसाठा आहे. अवैध उपसा होत राहिल्यास धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणी संपल्यावर तर उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरणांतील पाण्याचा अवैध उपसा बंद करण्यात आला. आतापर्यंत प्रशासन अपयशी ठरले आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी आणणार कोठून असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.