
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आरोग्य सेवा सुधारल्या, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या, परिसरात स्वच्छता नांदू लागली की माणसाचे आयुष्यमान वाढते. हिंदुस्थानबाबतही नेमके तेच आता दिसून आले आहे. म्हणूनच तर देशातल्या लोकांचे आयुष्यमान गेल्या 25 वर्षांत 8 टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 1991 साली लोकांचे आयुष्यमान 60.3 वर्षे होते, ते 2016मध्ये वाढून 68.7 वर्षे झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या वर्षीच्या स्टॅटिस्टिक हॅण्डबुकमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे आयुष्यमान जास्त वाढले असून राजधानी नवी दिल्ली याबाबतीत नंबर वन असल्याचेही हॅण्डबुकमध्ये नमूद करण्यात आले आहे.
1993 ते 1997 या कालावधीत पुरुषांचे सरासरी आयुष्यमान 60.4 वर्षे, तर महिलांचे आयुष्यमान 61.8 वर्षे होते. मात्र 2012 ते 2016 या काळात हे आयुष्यमान वाढून क्रमशः 67.2 वर्षे आणि 70.2 वर्षे झाले. म्हणजेच पुरुषांचे आयुष्यमान या कालावधीत सात वर्षांनी वाढले, तर याच काळात महिलांचे आयुष्य 8.4 वर्षांनी वाढले. बिहार हे देशातील एकमेव असे राज्य आहे, जिथे महिलांचे आयुष्यमान पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. बिहारमध्ये पुरुषांचे आयुष्यमान 68.9 वर्षे आहे, तर महिलांचे आयुष्य 68.5 वर्षे आहे.
सध्याच्या घडीला महिलांचे सर्वात कमी आयुष्यमान उत्तर प्रदेशात पाहायला मिळते. तिथे ते 65.6 वर्षे आहे. दुसऱया दृष्टीने पाहायचे तर पुरुषांचे आयुष्यमान सर्वात जास्त राजधानी दिल्लीमध्ये आहे. म्हणजे दिल्ली सर्वात पुढे आहे. तिथे पुरुषांचे सरासरी आयुष्य 72.7 वर्षे आहे. केरळमध्ये महिलांचे सरासरी आयुष्य सर्वाधिक म्हणजे 77.9 वर्षे आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ मागेच!
प्रत्येक राज्यांची तुलना केली तर पुरुषांच्या आयुष्यमानामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ ही राज्ये नेहमीच मागे राहिली आहेत. त्यातही छत्तीसगढ सर्वात मागे आहे. 1991मध्ये जेव्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ एकत्र होते, तेव्हा तेथील पुरुषांचे आयुष्यमान देशात सर्वात कमी म्हणजे 55.6 वर्षे होते, तर तेव्हा महिलांचे सरासरी आयुष्य पुरुषांहून कमी म्हणजे 55.2 वर्षे होते.
राज्यांमधील स्त्री-पुरुषांची स्थिती
राज्य पुरुष महिला
बिहार 68.9 68.5
झारखंड 67.8 68.0
राजस्थान 66.1 70.1
गुजरात 67.4 71.8
पंजाब 71.0 74.2
हरयाणा 67.2 72.0
महाराष्ट्र 70.8 73.7
आयुष्यमान सर्वात कमी असलेली राज्ये
राज्य पुरुष महिला
छत्तीसगढ 63.6 66.8
मध्य प्रदेश 63.7 67.2
उत्तर प्रदेश 63.9 65.6
आयुष्यमान सर्वाधिक असलेली राज्ये
राज्य पुरुष महिला
नवी दिल्ली 72.7 75.9
केरळ 72.2 77.9
जम्मू-कश्मीर 71.6 76.2



























































