हिवाळ्यात वापरा ‘हा’ फेस मास्क आणि फेस वॉश, काही मिनिटात चेहऱ्याला येईल नैसर्गिक चमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यासाठी काळजी घ्यावी लागते. काही वेळा त्वचेची काळजी घेण्याच्या अनेक पद्धतींचा अवलंब केला, तरीही त्वचा लवकर सुधारतेच असे नाही. महागडे ब्यूटी प्रोडक्ट वापरल्यानंतरही चेहरा निस्तेज आणि कोरडा दिसू लागतो. अशा वेळी जाणून घेऊया, हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी करायचे काही नैसर्गिक सौंदर्य उपाय.

दही आणि मध हे दोन्ही पदार्थ हिवाळ्यात उत्तम मॉइश्चरायझिंगसाठी वापरले जातात. यामध्ये औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या हळदीचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर व्हायला मदत होते. या दिवसांत दही आणि मधाचा फेस मास्क आणि हळदीच्या पाण्याने फेस वॉश यामुळे थंडीत तुमची त्वचा सतेज होऊ शकते. जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे काही सोपे उपाय.

मध आणि दही फेस मास्क
मध आणि दह्यापासून तयार होणारा फेस मास्क तयार करण्याकरिता एका बाउलमध्ये 2 चमचे दही घ्या. त्यामध्ये 1 चमचा मध घाला. हे दोन्ही पदार्थ एकजीव करून त्याची पेस्ट तयार करा. हा फेस मास्क 15-20 मिनिटांसाठी चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नियमित या फेस मास्कचा वापर केल्यास चेहरा तजेलदार होतो. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.

हळद आणि पाण्याचे फेस वॉश
हळद आणि पाण्याचे फेस वॉश तयार करण्यासाठी 1 लिटर पाणी गरम करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद घाला आणि गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या उजळ व्हायला मदत होईल.

दही, मध आणि हळदच्या पाण्याचे फायदे
दही आणि मधाचा फेस पॅक वापरल्यानंतर हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यामुळे हिवाळ्यात त्वचा नैसर्गिकरित्या उजळ, चमकदार आणि मुलायम होते. यामुळे चेहऱ्यावरील अँण्टीबॅक्टेरियल घटक, त्वचेवरील मुरुमं आणि डागही कमी होतात.