शांत झोपेमुळे ‘या’ गंभीर आजारांचा धोका टाळू शकता, कोणत्या ते वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निरोगी शरीरासाठी सकस, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाप्रमाणेच शांत झोपही आवश्यक आहे. दररोज साधारण 6 ते 8 तास घेतलेल्या झोपेमुळे शरीराला अनेक महत्त्वाचे फायदे होतात. कारण झोपेच्या वेळी शरीरात अनेक महत्त्वाचे हार्मोन्स तयार होत असतात जे शरीर निरोगी राहण्यासाठीही मदत करतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जे प्रौढ असून रात्री फक्त सात तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढणे किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होणे, असे त्रास होऊ शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील घ्रेलिन हार्मोनची पातळी वाढते. यामुळे भूक लागते शिवाय अति जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा होते. वजन वाढण्याचे हेही एक कारण असू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिने रात्री 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे वजन नियंत्रित राहण्याशिवाय इतरही फायदे होऊ शकतात. पाहूया….

एकाग्रता वाढवते
अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मेंदूचे कार्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होते तसेच कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ज्यांची झोप पूर्ण होते त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. मानसिक स्वास्थ्यासाठीही पुरेशी आणि शरीराला आवशक्यक तेवढी झोप घेणे गरजेचे आहे.

हृदयविकारांपासून बचाव
शांत आणि पुरेशा झोपेमुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. ह्रदयविकारापासून रक्षण होते. अपुऱ्या झोपेमुळे उद्भवू शकणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे ह्रदयरोग. झोपेचा कालावधी कमी झाला की, ह्रदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळेही उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढू शकतो. यामुळे ह्रदयरोग, रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाचा धोका टाळू शकता
ज्या लोकांना चांगली झोप येते त्यांना मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित आजार होण्याचे प्रमाण कमी असते. झोपेच्या कमतरतेमुळे टाईप-2 मधुमेह आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. यामुळे शरीरात इन्सुलिन या हार्मोनचा योग्य वापर होत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. 5 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.