
चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी लोक अनेक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात, मात्र यामुळे काही वेळा रसायनांचे दुष्परिणामही त्वचेवर दिसू शकतात. चेहऱ्याच्या विविध प्रकारच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी वांगीही मदत करू शकतात. वांग्याच्या वापरामुळे त्वचेवरील डाग नष्ट होण्यासाठी मदत होते. हे वाचून आश्चर्य वाटेल कारण आतापर्यंत वांग्याची भाजी, भरीत अशाप्रकारे चवदार भाज्यांमध्ये वांग्याचं नाव घेतले जाते, मात्र फारच कमी जणांना माहित असेल की, वांग्याचा वापर जेवणातच नाही, तर त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून केला जातो. वांग्यामध्ये अँण्टी एजिंग, जीवनसत्त्व सी हे घटक असतात. यामुळे चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. वांग्याचा रस, एग्प्लान्ट फेस मास्क यांचा वापर करून चेहऱ्यावरील डांग एवढेच नव्हे तर त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणेही कमी करण्यासाठी वांगे उपयुक्त ठरते. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढवणारे वांगे चेहरा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठीही मदत करते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वांग्याचा वापर कसा करावा, याविषयी जाणून घेऊया.
वाढत्या वयाची लक्षणे दूर करण्यासाठी मास्क
वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा दिसू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी वांगे गुणकारी आहे, कारण वांग्यामध्ये वृद्धत्वविरोधी घटक आहेत, जे त्वचेतील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याकरिता मदत करतात तसेच यामध्ये असलेले जीवनसत्त्व सी चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते. याकरिता वांग्याचा रस काढून त्यात थोडे विच हेझेल क्रिम मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. टोनरप्रमाणे याचा चेहऱ्यावर वापरा.
टॅनिंगपासून रक्षण होण्याकरिता मास्क
काही लोकांना कामानिमित्त जास्त वेळ उन्हात राहावे लागते. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. अशा वेळी वांग्याचा रस काढून त्वचेवर लावल्याने फायदा होऊ शकतो. वांग्यातील फायटोन्यूट्रिएंट गुणधर्म त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा टॅनिंगमुक्त होते.
मुलायम त्वचेकरिता
वांग्यात भरपूर असते. त्यामुळे हे पाणी त्वचेच्या छिद्रांना हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. वांग्याचे पाणी नियमितपणे त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम होते.
डागरहित त्वचेकरिता वांग्याचा मास्क
वांग्याचा फेस मास्क बनवण्यासाठी वांग्याला बारीक कापून गोल आकार द्या. आता एका भांड्यात दोन चमचे कोरफडीचा रस आणि एक चमचा नैसर्गिक मध मिसळा. त्यात वांग्याचे तुकडे टाका. अर्ध्या तासानंतर हे तुकडे चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क वापरल्याने तुमची त्वचा चमकदार आणि डागरहित दिसेल.
डाग, सुरकुत्या दूर करण्यासाठी मास्क
चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि पिगमेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी एग्प्लान्ट फेस मास्क वापरू शकता. हा मास्क बनवण्यासाठी वांगी बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
































































