
सामना प्रतिनिधी । पाथरी
पाथरी तालुक्याच्या अंधापुरी येथे वीज कोसळून 2 मेंढपाळांसह 40 शेळ्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य एक मेंढपाळ गंभीररित्या भाजल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे. तसेच दुसऱ्या एका वीज कोसळल्याच्या घटनेत लोणी बु. येथे एक बैल दगावला.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या अंधापुरी येथे ही दुर्घटना घडली. बीड जिल्ह्यातील सुनवाडी (ता. धारूर) येथील मेंढपालक रामभाऊ साधू शिंदे (50), बाळू सिताराम काळे (40), कृष्णा रामभाऊ शिंदे (18) हे गेली दीड महिन्यापासून अंधापुरी गावात शेळ्या घेऊन राहात आहेत. आंधपुरीचे सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात ते सोमवारी रात्री शेळ्यासह झाडाखाली थांबले होते. दरम्यान, रात्री जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला. यावेळी एक वीज मेंढपाळ थांबलेल्या झाडावर पडली. यात 40 शेळ्यासह बाळू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे गंभीरीत्या भाजले.
दुर्घटनेची माहिती कळताच गावातील दहा ते पंधरा जणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाथरी पोलिसांना माहिती देऊन जखमी रामभाऊ यांना उपचारासाठी अंबेजोगाई येथे दवाखाण्यात हलविण्यात आले. जखमी रामभाऊ यांच्या हाता-पायासह कंबरेला भाजले असल्याचे गणेश कोल्हे यांनी सांगितले. तर मृतांचा रात्री उशिरा पोलीस पंचनामा करून पुढील तपासणी पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.




























































