
निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी नंतर तब्बल 65 लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या वगळलेल्या मतदारांच्या नावांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. त्यानुसार अखेर निवडणूक आयोगाने वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर केली आहे.
14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली. त्याचबरोबर वगळलेल्या नावांमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासणे मतदारांना सोपे जावे म्हणून एक लिंकही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मतदार याद्यांची फेरतपासणी करताना पारदर्शकपणे काम करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.