लोकल घसरल्याने पश्चिम रेल्वेने मान टाकली! प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावरील बिघाडाने सर्वसामान्य प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून पुरते बेहाल झालेले असतानाच आज पश्चिम रेल्वेनेही मान टाकली. मुंबई सेंट्रलनजीक डाऊन धीम्या मार्गावरून कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा डबा घसरल्याने तब्बल अडीच तास पश्चिम रेल्वे मार्गावर गोंधळ सुरू होता. त्याचा फटका शंभरहून अधिक लोकल फेऱ्यांना बसला असून आठ ते दहा फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर ओढावली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकलच्या ट्रकमध्ये रांगा लागल्याने अनेक प्रवाशांना पायपीट करावी लागली.

पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सुरळीत सुरू असतानाच सकाळी 11.20 वाजता चर्चगेटहून आलेली लोकल कारशेडमध्ये जात असताना मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ घसरली. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतची माहिती मिळताच रेल्वेने तत्काळ घसरलेला डबा वेगळा करत लोकल हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली, मात्र या घटनेमुळे सर्व लोकल खोळंबल्या होत्या. त्यामुळे रेल्वेने धीम्या मार्गावरील अनेक गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्याचा जलद लोकलवर परिणाम झाल्याने त्या 15-20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांबाबत पश्चिम रेल्वेकडे विचारणा केली असता एकही गाडी रद्द केली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

स्थानकांमध्ये गर्दी
सकाळी गर्दीच्या वेळीच धीम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना गर्दीचा समाना करावा लागला. चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी स्थानकात बराच वेळा गाडी नसल्याने फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तसेच काही गाडय़ा जलद मार्गावर वळवल्याने त्यांनाही लेटमार्क लागला.

एसी लोकलचे दरवाजे उघडेच!
प्रकाशांना सायंकाळी भलताच अनुभव आला. चर्चगेटहून किरारच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलचे दरवाजे सायंकाळी 7.18 च्या सुमारास बंद होत नसल्याची घटना बोरिवली स्थानकात घडली. मोटारमनने वारंवार प्रयत्न करूनही दरवाजे बंद न झाल्याने बराच वेळ गाडीचा खोळंबा झाला. त्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्याने बिघाड दुरूस्त केल्यावर दरवाजे बंद झाल्याने गाडी मार्गस्थ झाली.