Lok Sabha 2019 बारामतीमध्ये सुप्रियाताई विरूद्ध कांचनताई मुकाबला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बारामती

भाजपने दुसरी यादी शनिवारी पहाटे प्रसिद्ध केली. या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा मुकाबला होणार आहे. 2014 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. राहुल कुल हे रासपतर्फे विधानसभा निवडणूक जिंकले होते. भाजपने यंदा ही जागा रासपला न देता स्वत: लढवायचं ठरवलं आहे.

2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विरोधात उभ्या असलेल्या महादेव जानकर यांचा 80 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे आमदार असून त्यांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळे या 25 हजार मतांनी पिछाडीवर होत्या. कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याने त्या आणखी पिछाडीवर जातील असा भाजपचा अंदाज आहे. कांचन कुल या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नात्यात लागतात. याचाही फायदा उचलण्याचा भाजप आणि कांचन कुल प्रयत्न करतील. 2014 साली महादेव जानकर यांनी कपबशी चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती. तर सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते.

दोन महिन्यांपूर्वी बोलत असताना महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आपण पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं जाहीर केलं होतं.  लोकसभेच्या निवडणुकीत रासपने पाच जागांची मागणी केली होती. या जागांमध्ये त्यांनी बारामतीसह नगर दक्षिण मतदारसंघही मागितला होता. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर जानकर यांनी भाजपला दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. नगरमध्ये बोलत असताना त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर करून टाकलं होतं.