Lok sabha 2019 शिवसेनेच्या वाघांची डरकाळी घुमणार, स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 20 नावांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीने अतिविराट सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. आगामी दिवसांमध्ये शिवसेनेच्या 20 बुलंद तोफा धडाडताना दिसणार आहेत. झंझावाती प्रचारातून शिवसेनेच्या वाघांची गगनभेदी डरकाळी अवघ्या महाराष्ट्रात घुमताना दिसेल.

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गिते, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरै, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसळकर, डॉ. निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे-पाटील, वरुण सरदेसाई आणि राहुल लोंढे यांच्या नावांचा समावेश आहे.