Lok Sabha Election 2019 सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात ‘दगडफोड्या’ लढविणार निवडणूक

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

‘एका चहावाल्याला मतदारांनी देशाच्या पंतप्रधानपदी बसविले मी तर दलित कुटुंबातील दगडफोड्या आहे. या दगडफोड्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार निश्चितच खासदार करतील असा आत्मविश्वास असल्याने सुशीलकुमार शिंदेंनी पराभवापूर्वी माघार घ्यावी’, असा सबुरीचा सल्ला वडार समाजाचे नेते पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीतील आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी घोडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यात बोलताना त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना इशारा दिला.

1999 मध्ये घोडके यांनी रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या विरोधात पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत घोडके यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी मात्र घोडके यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढण्याचा आणि ती जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

सोलापूर मतदार संघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली उमेदवारी यापूर्वीच घोषीत केली आहे. शिंदेच्या उमेदवारी बाबत घोडके यांना छेडले असता ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत शिंदेचा पराभव झाला होता. त्यामुळे शिंदेंनी या मतदारसंघातून उभे राहण्याऐवजी अन्य मतदारसंघ शोधावा. घोडके यांनी निवडणूक लढणार हे निश्चित केले असले तरी कोणत्या पक्षांकडून हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. सध्या मतदारसंघाचा दौरा सूरू असून मतदारांचा कौल पाहून आपण आपली भूमिका घेणार असल्याचे घोडके यांनी स्पष्ट केले.