देश जादेर चाईछे! बंगाल जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी आता केंद्रात झेप घेण्यास सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल निवडणुकीत बहुमत मिळवून भाजपला चीत करणाऱया ममता बॅनर्जी आता केंद्रात झेप घेण्यास सज्ज झाल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसची घोषणा जाहीर केली आहे. ‘देश जादेर चाईछे’ अशी ती घोषणा आहे. ‘संपूर्ण देशाला जो हवा आहे’ असा त्याचा अर्थ आहे. ही घोषणा आणि त्याबरोबर ममता बॅनर्जी व त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे पह्टो असलेली पोस्टर्स कोलकात्याच्या कानाकोपऱयात झळकली आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या ‘खेला होबे’ने नागरिकांवर मोहिनीच घातली होती. आता त्यांचे लक्ष्य 2024 ची निवडणूक आहे. 21 जुलै 1993 रोजी पोलिसांच्या गोळीबारात ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या 13 युवा कार्यकर्त्यांचे प्राण गेले होते. दरवर्षी तो दिवस तृणमूल काँग्रेसच्या वतीने ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो. येत्या 21 जुलै रोजी त्यानिमित्त ममता या एक व्हर्च्युअल मेळावा घेणार आहेत. त्याचे प्रक्षेपण केवळ बंगालमध्येच नाही तर दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्येही केले जाणार आहे.

दोन दिवसांत योजना जाहीर करणार

ममता बॅनर्जी या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना रोखणाऱया देशातील एकमेव नेत्या आहेत. हे बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे. आता राष्ट्रीय राजकारणाबद्दल त्या आपले धोरण आणि योजना दोन दिवसात सर्वांसमोर ठेवतील अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या एका राज्यसभा खासदाराने दिली आहे. गुजरातसारख्या राज्यात विरोधी पक्षाची जागा रिक्त आहे आणि तशा जागा मिळवायच्या अशी ममतादीदींची योजना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.