
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असताना फेसबुकने अनेक बनावट अकाऊंटस्वर बॉम्ब टाकला आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने फेसबुकवरून टीका केल्याप्रकरणी काँग्रेसशी संबंधित तब्बल 687 पाने फेसबुकने हटवली आहेत. देशातल्या मोठय़ा राजकीय पक्षाशी संबंधित इतकी मोठी कारवाई फेसबुकने पहिल्यांदाच केली आहे. याबाबत फेसबुकच्या सायबर सुरक्षा पॉलिसीचे प्रमुख नाथनेल ग्लेचियर यांनी सांगितले की, या पानांवर लोकल न्यूजच्या माध्यमातूनही मोठय़ा प्रमाणावर मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून अनेकांच्या फेसबुक अकाऊंटला टॅग करून सत्ताधारी पक्षाबद्दल टीका करणारे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.
सर्व पाने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित.
हटवण्यात आलेल्या पानांचा एक नमुनाही फेसबुकने जारी केला आहे.
यात राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्यातील एक वाक्य प्रसारित करण्यात आले असून त्यांना समर्थन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानी सैन्याशी संबंधित 103 पानेही हटवली
पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाशी संबंधित तब्बल 103 पानेही फेसबुकने हटवली आहेत. या पानांवरील मजकूर पाकिस्तानातून प्रसारित करण्यात येत होता. दरम्यान, जगभरातील राजकीय पक्षांकडून फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर चुकीची माहिती प्रसारित करण्यासाठी होत होता. एकमेकांवर टीका टिपण्णी करून राजकीय लाभ उठवण्याचे काम या माध्यमातून होत होते. अशा अनेक बनावट अकाऊंट्सच्या विरोधात आपण मोहीम उघडल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
‘नमो’ ऍपशी संबंधित पेजेसही हटवली
फेसबुकने सोमवारी सायंकाळी आणखी माहिती देताना सांगितले की, त्यांनी ‘सिल्व्हर टच’ नावाच्या एका हिंदुस्थानी आयटी कंपनीची 15 फेसबुक पाने आणि त्यांची खातीही हटवली आहेत. फेसबुकने केलेल्या चौकशीत ‘सिल्व्हर टच’ ही कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो ऍप’शी संलग्न होती. याशिया या कंपनीने पाकिस्तानात सुरू केलेली 103 फेसबुक पेजेस, ग्रुप्स आणि अकाऊंट्सही फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या मंचावरून हटवली आहेत.



























































