निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तीन टक्क्यांनी मतदान वाढले; कोणाला फायदा कोणाला तोटा…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी 12 राज्यातील 95 मतदारसंघात मतदान झाले. यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. या निवडणुकीत एकूण 68 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये 65 टक्के मतदान झाले होते. त्यात यंदा 3 टक्क्यांनी वाढ झाली. तर 2009 मध्ये 62.49 टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांनी मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात मतदारांचा उत्साह आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणत्या पक्षाला फायदेशीर ठरणार आणि कोणाला याचा फटका बसणार याबाबत उत्सुकता आहे.

दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 12 राज्यातील 95 मतदारसंघापैकी 2014 च्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला 64 जागांवर विजय मिळाला होता. या सर्व जागा राखण्यासोबतच आणखी जागा वाढवण्याचे आव्हान भाजप आणि मित्रपक्षांसमोर आहे. तर महाआघाडी केल्यामुळे 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसप्रणीत युपीए आघाडीने व्य़क्त केली आहे. या टप्प्यात 1629 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वाधीक मतदान पश्चिम बंगाल आणि पद्दुचेरीमध्ये 80.47 टक्के झाले आहे. तर सर्वात कमी मतदान जम्मू कश्मीरमध्ये 45.2 टक्के झाले आहे. उत्तर प्रदेशच्या नऊ जिल्ह्यातील आठ जागांवर 62.30 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा या ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत तुरळक वाढ झाली आहे.

2014 च्या निवडणुकीत या 95 जागांपैकी भाजपला 27 जागा मिळाल्या होत्या, तर एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या टप्प्यातील मतदान भाजप आणि एनडीएसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघापैकी फक्त 12 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. तर 36 जागा एआयएडीएमके, 4 जागा बीजेडी, 4 जागा शिवसेना, जोडीएसला 2 जागा, 2 जागा आरजेडी, जेडीयू आणि टीएमसीला प्रत्येकी एक तर 6 जागा इतरांना मिळाल्या होत्या. 2009 च्या तुलनेत काँग्रेसला 12 जागांचे नुकसान झाले होते. तर भाजपला 7 जागांचा फायदा झाला होता. तामीळनाडूत डीएमकेच्या जागा कमी झाल्या होत्या तर एआयडीएमकेला फायदा झाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत 2014 मध्ये गमावलेल्या 12 जागा परत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.