कांगारूंची अफगाणिस्तानवर 7 विकेटने शानदार मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ब्रिस्टॉल

पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने नवख्या अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ केला. अफगाणिस्तानकडून मिळालेले 208 धावांचे लक्ष्य कांगारूंनी 34.5 षटकांत 3 बाद 209 धावा करून पूर्ण केले. एरोन फिंच (66) व डेव्हिड वार्नर (नाबाद 84) यांनी अर्धशतके ठोकून फलंदाजीचा चांगला सराव केला. उस्मान ख्वाजा (15) व स्टीव्हन स्मिथ (18) परतल्यावर ग्लेन मैक्सवेलने चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. मोहम्मद शहझाद व हझरातुल्लाह झझाई ही सलामीची जोडी भोपळाही न फोडता तंबूत परतली. स्टार्कने तिसऱयाच चेंडूवर शहझादचे दांडके उडवून ऑस्ट्रेलियाला भन्नाट सुरुवात करून दिली. मग कमिन्सने पुढच्या षटकात दुसरा आघाडीवीर हझरातुल्लाह याला यष्टीमागे कॅरीकरवी झेलबाद करून अफगाणिस्ताची 2 बाद 5 अशी दुर्दशा केली. मात्र त्यानंतर रहमत शाह (43) व हश्मतुल्लाह शाहीदी (18) यांनी तिसऱया गडय़ासाठी 51 धावांची भागीदारी केल्यामुळे अफगाणिस्तानला 207 धावांचा पल्ला गाठता आला.

मधल्या फळीचा कडवा प्रतिकार

अफगाणिस्तानचा डाव 5 बाद 77 असा संकटात सापडलेला असताना मधल्या फळीतील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा कडवा प्रतिकार केला. कर्णधार गुलनबीन नायब (31) व नजीबुल्लाह झदरान (51) यांनी सहाव्या गडय़ासाठी 83 धावांची भागीदारी करीत अफगाणिस्तानला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. मार्कस स्टोईनिसने 34 व्या षटकांत या दोघांनाही यष्टीमागे झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचे बळी मिळवून दिले. मात्र त्यानंतरही तळाला राशिद खान (27) व मुजीब उर रहमान (13) यांनी झुंजार फलंदाजी करीत अफगाणिस्तानला 200 चा टप्पा ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान -रहमत शाह झे. स्मिथ गो. झम्पा 43, हश्मतुल्लाह शाहीदी झे. कॅरी झे. झम्पा 18, मोहम्मद नबी धावबाद (स्मिथ/कॅरी) 7, गुलनबीन नायब झे. कॅरी गो. स्टोईनिस 31, नजीबुल्लाह झदरान झे. कॅरी गो. स्टोईनिस 51, राशिद खान पायचित गो. झम्पा 27, मुजीब उर रहमान त्रि. गो. कमिन्स 13. बाद क्रम ः 1-0, 2-5, 3-56, 4-75, 5-77, 6-160, 7-162, 8-166, 9-205, 10-207. गोलंदाजी – मिचेल स्टार्क 7-1-31-1, पॅट कमिन्स 8.2-0-40-3, मार्कस स्टोईनिस 7-1-37-2, ऍडम झम्पा 8-0-60-3. ऑस्ट्रेलिया – 34.5 षटकांत 3 बाद 209