
राजापूरच्या वैशिष्टयांत आता नव्याने भर पडणार आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात अर्जुना नदीवर नव्याने उभारल्या जात असलेल्या महामार्गावरिल सर्वाधिक उंचीच्या पुलामुळे राजापूर चर्चेत येत आहे. सुमारे साडेचारशे किलोमिटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात हा सर्वाधिक उंचीचा पूल असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या चार महिन्यात हा पूल मार्गी लागणार असून या पुलामुळे राजापूरची नवी ओळख निर्माण होणार आहे.
अर्जुना नदीवर उभारला जात असलेला हा सुमारे 36 मिटर उंच, 300 मिटर लांबीचा आणि 30 मिटर रूंदीचा दुहेरी पूल म्हणजे महामार्गावरील आनंददायी सफरीचा केंद्रबींदू ठरणार असून सध्या तरी महामार्गावर अस्तित्वात असलेल्या व नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलांमध्ये नदीपात्रातील सर्वाधिक उंचीचा पूल म्हणून ओळखला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारला जात आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. राजापूर तालुक्यात वाकेड ते तळगाव हे सुमारे 34 किलोमिटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. रस्ते बांधकाम क्षेत्रातील प्रसिध्द अशा केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून हे काम केले जात आहे. राजापूरातून हा महामार्ग राजापूर एसटी डेपोकडून पुढे मिनाताई ठाकरे व्यापारी संकुल व महामार्गावरील दर्ग्यापासून पुढे सारंग बागेतून थेट अर्जुना नदीवरील सुमारे 30 मिटर लांबीच्या पुलाने थेट गाडगिळवाडी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे आता या भागातील रखडलेले कामही लवकरच जागा मालकांना मोबदला वाटप करून सुरू होणार आहे. मुंबई ते गोवा असा सुमारे साडेचारशे किलोमिटरचा हा महामार्ग आहे. या महामार्गावर छोटे मोठे सुमारे 70 ते 75 पूल आहेत. मात्र, यात आता सर्वाधिक उंचीचा पूल म्हणून राजापूरच्या पूलाची ओळख निर्माण होणार आहे. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या ब्रिटीशकालीन पुलापासून अर्जुना नदीपात्रात शिळकडे जाताना पुढे सुमारे 100 ते 125 मिटर लांबीवर हा नवीन पूल बांधला जात आहे. सारंग बागेतून थेट अर्जुना नदीवरून पुढे गाडगिळवाडीतून सध्याच्या महामार्गाला हा पूल जोडला जात आहे.
या दुहेरी पुलासाठी एकूण 16 पिलर टाकले गेले असून अर्जुना नदीपात्रातुन सुमारे 36 मिटर उंचीच्या दोन पुलांसाठी चार पिलर टाकले गेले आहेत. तर उर्वरित पिलर सुरुवातीला, शेवटी आणि मध्यभागी टाकले जाणार आहेत. नदीपात्र आणि जमिनीवरून असा एकूण सुमारे 300 मिटर रूंदीचा हा पूल असून यात नदीपात्रातील लांबी ही 220 मिटर तर जमिनीवरील लांबी ही सुमारे 80 मिटर इतकी रहाणार आहे. सध्याच्या महामार्गाला हा पूल व रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे सुमारे 700 ते 800 मिटर इतके अंतर कमी होणार असून या पुलामुळे 11 वेडीवाकडी अवघड आणि छोटी-मोठी वळणे कमी होणार आहेत. त्यामुळे या पूलावरून प्रवास अत्यंत वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
























































