
अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देशातील कित्येक नागरिक रेशन कार्ड या सुविधेचा लाभ घेतात. त्यांना कमी दरात अन्नधान्य मिळावं म्हणून रेशनकार्डाची योजना करण्यात आली आहे. मात्र, राजस्थानात एक वेगळाच प्रकार उघड झाला आहे. इथल्या एका रेशनकार्डावर चक्क श्री हनुमानाचं नाव लिहिलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानमधील भरतपूर येथे दोन रेशन कार्ड सध्या चर्चेत आहेत. या रेशनकार्डांवर ढुंढारवाले हनुमानजी आणि मंदिर मुरली मनोहर जी अशी नावं लिहिली आहेत. यातील एका रेशनकार्डावर श्री हनुमानांचं वय 81 वर्षं असं लिहिण्यात आलं आहे.
तसंच श्री हनुमान यांच्या वडिलांच्या नावाच्या जागी केसरी असं लिहिलं आहे. भरीसभर म्हणून श्री हनुमानांची तसबीरही फोटोच्या जागी चिकटवण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबात पाच जण असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दुसऱ्या रेशन कार्डावर मुरली मनोहरजी असं नाव लिहिण्यात आलं असून त्यांचं वय 121 वर्षं असं लिहिण्यात आलं आहे.
या दोन्ही रेशन कार्डांवरून वेळोवेळी केरोसिनची खरेदी झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. या रेशनकार्डांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन या प्रकाराची चौकशी करत आहे. काही अधिकाऱ्यांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच यावर कारवाई होईल, असं स्थानिक प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
























































