सिलिंडरची दरवाढ जोमात, सामान्य माणूस कोमात; गृहिणींच्या हाती पुन्हा चुलीची फुंकणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चुलीतील धुरामुळे होणारी आरोग्याची हानी टाळण्यासाठी 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत चूल असलेल्या घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचवण्याचं उद्दिष्ट होतं. पण, सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे आता सामान्य जनता पुन्हा चुलीकडे वळू लागल्याचं वृत्त आहे.

द टेलिग्राफ या वृत्तपत्राने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. उज्ज्वला योजनेंतर्गंत अनेक गावांना मोफत गॅस सिलिंडर देऊन त्यांचं आयुष्य बदलवणार असल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. मात्र, आता अनेक गावांमध्ये लोकांनी सिलिंडर वापरणं बंद केल्याचं चित्र आहे. यात झारग्राम, पश्चिम मिदनापूर येथील 100 गावांमधील तब्बल 42 टक्के जनतेचा समावेश आहे.

या गावांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात 100 गावांतील 560 घरांचा समावेश होता. या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांनी तो वापरण सोडून दिलं असून आता पुन्हा ते चुलीवर स्वयंपाक करत आहेत.

या बदलाची तीन कारणं सांगण्यात येत आहेत. यातील पहिलं कारण हे चढते गॅसदर हे असून दुसरं कारण, गॅसचा अपुरा पुरवठा आहे. तिसरं म्हणजे कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानानंतर आता वाढत्या किमतींचा फटका बसल्याने हा निर्णय घेतल्याचं या कुटुंबांचं म्हणणं आहे.

गॅसवरचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक कुटुंब पुन्हा जंगलातून सरपण आणत आहेत. सिलिंडर बाजूला ठेवून चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

सतत चुलीजवळ बसणाऱ्या महिलांच्या फुफ्फुसात कार्बन गेल्याने त्यांच्या आरोग्याची हानी होते. ही हानी टळावी याचसाठी 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केली होती. पण, या योजनेचा बोजवारा उडत असल्याचं पाहायला मिळत आहे.