
पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर आता घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरची वाटचाल झपाटय़ाने एक हजार रुपयांकडे सुरू आहे. अवघ्या 15 दिवसांत गॅस तब्बल 50 रुपयांनी महागला असून, किचनचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय त्रस्त झाला आहे.
14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बुधवारी 25 रुपयांनी वाढ झाली. यापूर्वी 17 ऑगस्टला सिलिंडर 25 रुपयांनी महागले होते. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची तब्बल 75 रुपयांनी दरवाढ केली आहे. 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2021 या आठ महिन्यात गॅस सिलिंडर 190.50 रुपयांनी महाग झाले आहे.
सबसिडी बंदच
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर केंद्र सरकारकडून सबसिडी देण्यात येत होती. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बहुतांशी ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कमच जमा होत नाही. अचानकपणे केंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे.
कमावलेले 23 लाख कोटी गेले कुठे
‘जीडीपी’त वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल महाग. या दरवाढीतून मोदी सरकारने कमावलेले 23 लाख कोटी रूपये गेले कुठे? असा खडा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 2014 मध्ये युपीएने सरकार सोडले त्यावेळी गॅस सिलिंडरची किमत 410 रूपये होती. आज 885 रुपयांवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 32 टक्के तर गॅसच्या किंमतीत 26 टक्के घट झाली. तरीही देशातील नागरिकांना याचा लाभ मिळत नाही. मोदी सरकारकडून लूट सुरू आहे. दुसरीकडे केंद्राकडून मॉनिटायझेशनच्या नावाखाली राष्ट्रीय मालमत्ता विकली जात आहे असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.



























































