गोरखनाथ मंदिरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

गोरखनात मंदिरात दोन पोलिसांवर हल्ला करणाऱ्या अहमद मुर्तझा अब्बासी याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखनऊतील विशेष न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे. एप्रिल 2022 मध्ये अहमदला या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी अहमदला खुनाचा प्रयत्न करणे, देशविघातक कारवाया करणे या आरोपांखाली दोषी ठरवलं होतं. यानंतर त्याला शिक्षा काय व्हावी याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी अहमदला फाशीची शिक्षा सुनावली.

अहमद याने आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. संध्याकाळी सात वाजता तो गोरखनाथ मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर पोहोचला होता. डय़ुटीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी गोविंद गौड आणि अनिल पासवान यांना त्याच्यावर संशय आला होता. त्याला तपासणीसाठी त्यांनी रोखले असता अब्बासीने आपल्याकडील धारदार शस्त्र बाहेर काढले आणि ‘अल्ला हू अकबर’ असा नारा देत गोरखनाथ मंदिराच्या पश्चिमेकडील द्वारापासून आतील परिसर आणि पोलीस ठाण्यापर्यंत 15 मिनिटे त्याने दहशत माजवली. मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांचीही त्याच्या भीतीने पळापळ झाली होती. ‘तुम्ही मला गोळ्या घाला’ असे तो पोलिसांना ओरडून सांगत होता. ज्यादिवशी अहमद मुंबईहून गोरखपूरला आला होता, त्या दिवशी त्याने हे कृत्य केलं होतं. अहमद हा इसिसच्या संपर्कात होता आणि तो दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा असल्याचे पोलिसांनी यापूर्वीच सांगितले होते.