Hathras case – तुमची मुलगी असती तर गुपचूप अंत्यसंस्कार केले असते का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमची मुलगी असती तर हाथरसप्रमाणे गुपचूप रातोरात अंत्यसंस्कार तुम्ही केले असते का? पैसेवाल्याची मुलगी असती तर असे अंत्यसंस्कार करण्याची तुमची हिंमत झाली असती का? असे जळजळीत सवाल करीत उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला जोरदार खडसावले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्याकांडप्रकरणी देशभरात संताप आहे. या भयंकर प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे दिला असला तरी, याप्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी यावर सुनावणी झाली. यावेळी पीडितेचे आई-वडील, भाऊ, वहिनी असे संपूर्ण कुटुंब उच्च न्यायालयात हजर होते. उत्तर प्रदेश सरकारचे प्रशासकीय आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी कोर्टात उपस्थित होते. पीडित तरुणीच्या वहिनीने जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या धमकीची माहिती कोर्टात दिली. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या वतीने अॅड. सीमा कुशवाह यांनी पीडितेच्या पार्थिवावर गुपचूप जबरदस्तीने रॉकेल टाकून प्रशासनाने अंत्यसंस्कार केल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थितीत करीत तीव्र शब्दांत सालटे काढले. याबाबतची माहिती अॅड. सीमा कुशवाह यांनी दिली, असे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

कोर्टाचे फटकारे

  • जर तुमची मुलगी असती तर तिचा चेहरा न पाहता असे अंत्यसंस्कार केले असते का? असा थेट सवाल कोर्टाने अतिरिक्त पोलीस महासंचालक (लॉ अॅण्ड ऑर्डर) प्रशांत कुमार यांना केला. यावर प्रशांत कुमार काहीही उत्तर देऊ शकले नाहीत.
  • पैसेवाल्याची मुलगी असती तर तुमची अशी हिंमत झाली असती का?
  • जसा पैसेवाल्यांना, बडय़ा श्रीमंतांना एका मताचा अधिकार आहे, तसाच देशातील दलीत, गरिबांनाही मतांचा अधिकार आहे.

तपास मुंबई, दिल्लीत हलवावा

यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तीन मागण्या कोर्टापुढे केल्याचे अॅड. सीमा कुशवाह यांनी सांगितले. हा तपास मुंबई किंवा दिल्ली हलवावा, जर तपास हलवता येत नसेल, तर खटला तरी दुसरीकडे चालवावा. कुटुंबाला सुरक्षा द्यावी. तसेच तपास पुठपर्यंत आला हे जनतेला कळले पाहिजे. दरम्यान, यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, 2 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.