दहशतवाद्यांना मुक्त करा नाहीतर… लखनऊच्या मंदिरांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्यांनी खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनऊ येथील प्रसिद्ध अशा अलिगंज हनुमान मंदिर आणि डालीगंज येथील मनकामेश्वर मंदिर या मंदिरांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांना सोडा नाहीतर मंदिरांवर बॉम्ब हल्ले करू अशा धमक्यांची पत्रं या मंदिरांना येत आहेत. आधी अलिगंज येथील हनुमान मंदिराला हे पत्र आलं होतं. त्यानंतर मनकामेश्वर मंदिराला शनिवारी धमकीचं पत्र मिळालं. या मंदिराचे महंत देव्या गिरी यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने 11 जुलै रोजी मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन उर्फ मुशीर यांना लखनऊवरून अटक केली होती. या दोघांकडून आधुनिक शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची सामुग्री जप्त करण्यात आली होती. एकाच्या घरी प्रेशर कुकरमध्ये तयार केलेला बॉम्ब आणि दुसऱ्याच्या घरी अशाच दुसऱ्या कुकर बॉम्बची तयारी सुरू असल्याचं आढळलं होतं.

या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्यासोबत अन्य तिघांची नावंही उघड झाली होती. मोहम्मद मुस्तकीम, मोहम्मद मुईद आणि शकील अशा तिघांना त्यानंतर अटक करण्यात आली होती.

आता या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी मंदिरांना धमक्या मिळू लागल्या आहेत. तर या धमक्यांना धूप न घालता भाविकांनी मंदिरात नियमितपणे यावं, असं आवाहन देव्या गिरी यांनी केलं आहे.